Monday, August 23, 2010

आओ हूजूर तुमको सितारोंमे

अरेअरे... कूठून हे गाणे यूट्य़ूबवर शोधून पहाण्याची बुद्धी झाली. आशाताईंच्या आवाजातली कलाकुसर, ते आवाजातले हास्य आणि अवखळपणा या सगळ्याचा बबिताने बट्याबोळ केला आहे। ही जूनी गाणी फक्त ऐकावीत, अजिबात पाहू नयेत।

तर या गाण्यात आशाताई दोन वेळा मधल्या आलापात जबरदस्त गिरक्या असलेल्या हरकती घेतात आणि त्याच हरकती मग सॅक्सोफोनवर जशाच्या तशा ऐकू येतात।

आहाहा ... आआआ .... आहाहा ... आआआआआ...

कौतुक या गोष्टीचे वाटते की हे दोन आवाज एवढ्या वेगवेगळ्या धरतीचे, पण एकत्र येवून केवढी कमाल करतात। प्रशंसा करावी तेवढी थोडीच। ही अशी हरकत, त्यामागोमाग सॅक्सोफोनवरील हे काम, या दोन्हीन्चे एकमेकाबरोबर जाणे स्तिमित करून जाते। ज्यावेळी हे गाणे रेकॉर्ड झाले त्यावेळी प्रत्यक्ष हे अनुभवताना काय वाटले असेल? कुणास ठावूक।

आहाहा ... आआआ .... आहाहा ... आआआआआ...

आशाताई, तुम्ही पुन्हा आमच्या मरीन काऊंटीला भेट कधी द्याल हो? तुम्हाला इकडे घरी बोलवून वरणभात-भाजीपोळी (किंवा तुम्ही म्हणत असाल तर पापलेटं, झींगे करू) खायला घालायची आणि गप्पा मारायच्या असे माझे स्वप्न आहे। हो हो... तुमच्या प्रत्येक चाहतीबरोबर एवढा वेळ घालवणे तुम्हाला शक्य नाही, खरेय। पण स्वप्नाला कुठे असली पर्वा असते?

Saturday, August 14, 2010

तुम तो प्यार हॊ

आवडीनिवडी या अनुभवांशी फार बांधलेल्या असतात. कधीतरी कुठेतरी एखाद्या गोष्टीचा सुंदर अनुभव आलेला असतो, तो मनाच्या कोपरयात कायम असतो. त्या गोष्टीचा संदर्भ कुठे आला की हा अनुभव आपला सुगंध जसाच्या तसा पसरवतो. पण तो फ़क्त ज्या व्यक्तीचा अनुभव आहे त्यालाच जाणवतो. मन आनंदते. या गाण्याचे असेच आहे. एका लांबच्या प्रवासात या गाण्यातला प्रत्येक आवाज बारकाइने ऐकला होता. यातल्या सतत वाजणाऱ्या मेटालिक आवाजाची मजाही अनुभवली होती. ट्रायॅंगल असावा.

हा सतत वाजणारा ट्रायॅंगल आणि लताबाईंचा आवाज - अगदी एकच सूर आहे. एकटीच गाडीत किंवा घरी असावे, घर शांत (आणि स्वच्छ) असावे, आणि हे गाणे कानावर पडावे. एकतर त्या टिंगडिंग टिंगडिंग ठेक्यावर मान डोलावण्याचा मोह आवरत नाहि. हे केल्याने एकूण आनंदात थोडीशी भरच पडते. आणि दुसरे त्या मंजूळ ठेक्यावर तो सुपर-मंजूळ आवाज. भिडतो. मन नुसतच प्रसन्न होत नाही, आनंदी होतं. कोण म्हणतं आनंद मिळवण्याचा फॉर्म्य़ुला नाही म्हणून?





Sunday, October 5, 2008

निरंतर प्रभावित

काल जय म्हणाला "मला माझा शाळेचा पहिला दिवस आठवतोय".
म्हटले "थापा मारू नकोस. काय आठवतेय तुला सांग बरं? "

"तू मला क्लासमध्ये सोडून गेलीस, आणि मी खूप रडलो. " जय.

"तू आज कोणालातरी रडताना पाहिले असशील, आणि आता मला त्याची कहाणी सांगतोयस. सांग बरं तुझ्या थ्रीज क्लासमधल्या टीचरचं नाव. " मी.

"टीचरचं नाव आठवत नाही, पण तिने हिरवा शर्ट घातला होता. " जय. आहाहा! जेमतेम सात वर्षाचे वय आणि टोलेजंग थापा? शर्टाचा रंग निवडलास. मला कुठे लक्षात आहे तिच्या शर्टाचा रंग!?

"आणखी काय आठवते तुला? " मी जयला.

"मी खूप वेळ रडलो, आणि सोफिया मला समजावायला आली. " जय.

सोफिया होती त्याच्या थ्रीजच्या क्लासमध्ये, आणि तिने त्याच वर्षी ती शाळा सोडली होती. याला खरोखरच आठवतेय? आणि ही चार वर्षांपूर्वीची गोष्ट, म्हणजे त्यावेळी जयचे वय वर्षे तीन!

"तुला आपले जुने घर आठवते का? " ते घर बदलूनही चार वर्षे होत आली आहेत.

"हो. आपल्या शेजारी राहणारी बाई गोरी (व्हाइट) होती. " - इंटरेस्टिंग. सिल्विया आठवतेय याला?

"आणि तिकडची छोटी शाळाही आठवत्येय. " जय. आता मात्र कमाल झाली. ही सोफियाच्याही आधीची गोष्ट!

"त्या शाळेतले काय आठवतेय? " मी - जयला.

"त्या शाळेत मला दुपारी झोपायला लावायचे. सगळीकडे अंधार असायचा. मला अजिबात आवडायचे नाही. "

अरे देवा! तिथेच तर सुरुवात झाली होती त्याच्या ऍक्झायटीची! सगळी मुले डे-केअर मध्ये जातात. जयलाही सवय व्हायला हवी या माझ्या अट्टहासाने, नवरा नको म्हणत असताना, त्याला घरगुती डे-केअर मध्ये घातले. तो एवढा रडला की त्या बाईने सांगितले "बाकीच्या मुलांवर परिणाम होतो. तुम्ही थोडे दिवस थांबून बघा, किंवा दुसऱ्या ठिकाणी सोय करा. " माझं इतकं गोजिरं मूल दुसऱ्या कोणाला नकोसं वाटू शकतं ही जाणीव पहिल्यांदाच. पालकत्वाच्या ट्रेनिंगमधला महागात पडलेला एक धडा. :)

जयला हे सगळे आणखी किती दिवस आठवेल कुणास ठाऊक. सात वर्षांचा असताना त्याला अडीच-तीन वर्षाचा असतानाच्या गोष्टी आठवतायत. जरनल ठेवायला हवी.

माझी जुन्यात जुनी आठवणही शाळेतली, मी ५-६ वर्षांची असेन. बालवर्गात गणेश मातोंडकर नावाचा मस्तीखोर मुलगा होता (बा गणेशा, तू केलेले इंप्रेशन लक्षात घे, बाकी काय म्हटलेय ते सोडून दे ; ) त्याने त्याच्या वयाला न शोभणारे काही बोलल्याचे पुसटसे आठवतेय. बालवर्गातल्या छोट्या लाकडी, निळ्या रंगांच्या बैठया बाकावर बसून त्याने ती मुक्ताफळे उधळली होती हेही आठवतेय.

पुढची आठवण इयत्ता दुसरी. मावसभावाच्या लग्नासाठी पुण्याला गेलो होतो. लग्नातल्या पुणेरी जेवणाची (सुधारस आणि अळूचे फदफदे हा लग्नाच्या जेवणाचा मेनू लक्षात राहिलाय! ) मावशी मंडळात झालेली चर्चा, आणि लग्नाहून परत येताना बसला झालेला अपघात, त्या अपघाताचे मी गवळी बाईंकडे केलेले वर्णन.

गणेश मातोंडकरचे बोलणे आठवत नसले तरी त्याने लॉंग लास्टिंग इंप्रेशन माझ्या मनावर केले होते हे स्पष्ट आहे. सुधारस हा पूर्वी कधीही न चाखलेला पदार्थ प्रिय मावशीमंडळात एवढी खळबळ उडवतो म्हणजे हा काहीतरी महा सोफिस्टिकेटेड प्रकार दिसतो अशी नोंद मेंदूने केली. आणि त्या अपघातामुळे गवळी बाईंची भरपूर सहानुभूती आणि त्यांच्याबरोबर एअर टाइमही मिळवता आला एवढे कळले.

पाचवीत असताना आजोबा गेले तेव्हा आईला पहिल्यांदा रडताना पाहिले. मोठी माणसेही रडतात हे कळले.

सातवी आठवीत रामुगडे सरांबरोबर शाळेच्या मासिक भित्तिपत्रकावर केलेले काम बरेच काही शिकवून गेले. मासिकासाठी माहिती, चित्रे जमा करणे, लेख लिहिणे, एक छोटी कविता केल्याचेही आठवतेय. रामुगडे सरांच्या खूप आठवणी आहेत. बऱ्याचा वर्षांनी एकदा कुर्ला स्टेशनवर भेटले होते. खूप गप्पा मारल्या. नंतर काही दिवसांनी कळले की त्यांचा अपघाती मृत्यू झाला. अजूनही त्यांचा हसरा, मिष्किल चेहेरा डोळ्यांसमोर येतो. माझ्या गांधीजींच्या चित्राला खूप हसले होते सर - गांधीजी जरा बाळसेदार दिसतायत म्हणून. ट्रेनमधून पडून मृत्यू? विश्वास बसला नाही माझा. काय झाले असावे बरे? रामुगडे सर शाळेत आले तेव्हा त्यांचे लग्नही झाले नव्हते. किंचित काळेपणाकडे झुकणारा सावळा वर्ण, सोनेरी काड्यांचा स्मार्ट चष्मा, दाढी, एकूण आनंदी व्यक्तिमत्व. मराठी आणि समाजशास्त्र शिकवायचे, अगदी मनापासून. अगदी "तारे जमींपर" मधल्या आमीर खान सारखे रंगीबेरंगी कपडे घालून नाचत नसत, पण यू गेट दी आयडिआ. मला पक्के माहित आहे की माझ्यासारख्या आणखी शेकडो विद्यार्थ्यांना ते तसेच आठवत असतील. ही टच्ड सो मेनी लाइव्हस फॉरएव्हर.

साउजी सरांनी वि. स. वाळिंबेंचे "वोल्गा जेव्हा लाल होते" वाचायला सांगितले. लायब्ररीतून लगेच मिळवून वाचले, आणि त्यानंतर ऐतिहासिक पुस्तके वाचण्याचा सपाटाच लावला. एक छोटी गोष्ट, पण आयुष्यभराची आवड आणि सवय देउन गेली.

मावशी, काका, मामा यांच्या बऱ्याच आठवणी. साळवी काकांनीही बरेच लाड केले. अजूनही करतात भेटले की. पण भेटच दुर्मिळ झालिये. मी काय वाचतेय, काय ऐकतेय याच्याकडे आई-बापूंचे नव्हते तेव्हढे त्यांचे लक्ष होते त्यावेळी. मला शास्त्रीय संगीतातले फार काही कळत नव्हते. पण किशोरी आमोणकर, कुमार गंधर्वांचे गाणे ते आवर्जून ऐकवायचे. अनवट रागांबद्दल सांगायचे.

खरेच एक आयुष्य बनविण्यात किती व्यक्तिंचा आणि घटनांचा हातभार लागलेला आहे. कुणाकुणाकडून काय काय घेतलेय... आय ऍम इटर्नली इंप्रेस्ड.