Monday, August 23, 2010

आओ हूजूर तुमको सितारोंमे

अरेअरे... कूठून हे गाणे यूट्य़ूबवर शोधून पहाण्याची बुद्धी झाली. आशाताईंच्या आवाजातली कलाकुसर, ते आवाजातले हास्य आणि अवखळपणा या सगळ्याचा बबिताने बट्याबोळ केला आहे। ही जूनी गाणी फक्त ऐकावीत, अजिबात पाहू नयेत।

तर या गाण्यात आशाताई दोन वेळा मधल्या आलापात जबरदस्त गिरक्या असलेल्या हरकती घेतात आणि त्याच हरकती मग सॅक्सोफोनवर जशाच्या तशा ऐकू येतात।

आहाहा ... आआआ .... आहाहा ... आआआआआ...

कौतुक या गोष्टीचे वाटते की हे दोन आवाज एवढ्या वेगवेगळ्या धरतीचे, पण एकत्र येवून केवढी कमाल करतात। प्रशंसा करावी तेवढी थोडीच। ही अशी हरकत, त्यामागोमाग सॅक्सोफोनवरील हे काम, या दोन्हीन्चे एकमेकाबरोबर जाणे स्तिमित करून जाते। ज्यावेळी हे गाणे रेकॉर्ड झाले त्यावेळी प्रत्यक्ष हे अनुभवताना काय वाटले असेल? कुणास ठावूक।

आहाहा ... आआआ .... आहाहा ... आआआआआ...

आशाताई, तुम्ही पुन्हा आमच्या मरीन काऊंटीला भेट कधी द्याल हो? तुम्हाला इकडे घरी बोलवून वरणभात-भाजीपोळी (किंवा तुम्ही म्हणत असाल तर पापलेटं, झींगे करू) खायला घालायची आणि गप्पा मारायच्या असे माझे स्वप्न आहे। हो हो... तुमच्या प्रत्येक चाहतीबरोबर एवढा वेळ घालवणे तुम्हाला शक्य नाही, खरेय। पण स्वप्नाला कुठे असली पर्वा असते?

Saturday, August 14, 2010

तुम तो प्यार हॊ

आवडीनिवडी या अनुभवांशी फार बांधलेल्या असतात. कधीतरी कुठेतरी एखाद्या गोष्टीचा सुंदर अनुभव आलेला असतो, तो मनाच्या कोपरयात कायम असतो. त्या गोष्टीचा संदर्भ कुठे आला की हा अनुभव आपला सुगंध जसाच्या तसा पसरवतो. पण तो फ़क्त ज्या व्यक्तीचा अनुभव आहे त्यालाच जाणवतो. मन आनंदते. या गाण्याचे असेच आहे. एका लांबच्या प्रवासात या गाण्यातला प्रत्येक आवाज बारकाइने ऐकला होता. यातल्या सतत वाजणाऱ्या मेटालिक आवाजाची मजाही अनुभवली होती. ट्रायॅंगल असावा.

हा सतत वाजणारा ट्रायॅंगल आणि लताबाईंचा आवाज - अगदी एकच सूर आहे. एकटीच गाडीत किंवा घरी असावे, घर शांत (आणि स्वच्छ) असावे, आणि हे गाणे कानावर पडावे. एकतर त्या टिंगडिंग टिंगडिंग ठेक्यावर मान डोलावण्याचा मोह आवरत नाहि. हे केल्याने एकूण आनंदात थोडीशी भरच पडते. आणि दुसरे त्या मंजूळ ठेक्यावर तो सुपर-मंजूळ आवाज. भिडतो. मन नुसतच प्रसन्न होत नाही, आनंदी होतं. कोण म्हणतं आनंद मिळवण्याचा फॉर्म्य़ुला नाही म्हणून?